जल व्यवस्थापनासाठी पाऊस माहित नाही? काळजी नको- आपल्या शिवारातील विहिरींकडे बघा

गेल्या दशकभरात किंवा त्याहून अधिक काळ महाराष्ट्रामध्ये अनेक समस्या पुढे आल्या आहेत. शेती आणि पाणी यांच्या दृष्टीने महत्वाच्या अश्या दुष्काळाची वारंवारता आणि पावसाची अनियमितता आता धोक्याची ठरू लागली आहे. साहजिकच अनेकांचा कल हा भूजलाचा वाढता उपसा याकडे आहे. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातील अनेक खेड्यांमध्ये एका आंधळ्या शर्यतीचा खेळ उलगडतांना दिसतोय. प्रत्येक जण, ज्याच्याकडे जमीन आहे तो/ती आपल्या शेतामध्ये नवीन विहिरी घेत आहे, नवीन बोअरवेल घेत आहे आणि इतकेच नाही तर अधिक खोलवर जाण्याची तयारी  त्यांची आहे. शेतीसाठी पाण्याची निश्चितता व्हावी त्यामुळे हा सगळं खटाटोप सुरु आहे.

एकाच पेल्यात अनेक straw टाकले आहेत. लक्षात घ्या पेला तितकाच आहे, फक्त straw वाढलेत (स्रोत-विकी कॉमन्स)

पण याच्या अनेक दुष्परिणामांपैकी एक म्हणजे गावाच्या जल सुरक्षिततेवर होणार परिणाम. जेव्हा अनेक स्रोत निर्माण होतात, तेव्हा जमिनीतील पाणी वाढत नसून असलेल्या पाण्याची मागणी आणि वाटणी फक्त वाढते. आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरण घ्यायचे तर कोल्ड-ड्रिंक च्या बाटलीचे घेऊया. होते काय तर त्यामध्ये अनेक लोकं आपापला स्ट्रॉव (straw) टाकतात आणि आपापल्या क्षमतेनुसार (किंवा कधीकधी गरजेनुसार) त्यातील पेय शोषून घेऊन ते पितात. आपल्या जमिनीखाली असलेल्या भूजलधारकांमध्ये देखील असेच काहीसे होते. त्यातील पाणी त्या वर्षासाठी मर्यादित असते आणि त्यामध्ये अनेकजण आपल्या विहिरी, बोअरवेल यांच्या माध्यमातून पाणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात. जमिनीखालील हे गूढ क्वचितच कोणाला उलगडते म्हणून त्याला आंधळी शर्यत म्हंटलं आहे. फक्त या खेळामध्ये प्रत्येकाने डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते आणि प्रत्येकाचा प्रयत्न पाण्यापर्यंत पोहोचण्याचा असतो.

यातून बाहेर पडायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या गावातील भूजलाची स्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच आपल्या गावातील पेयजलाची गरज, पिकं-पद्धती, पाण्याची इतर गरजांसाठी मागणी ही देखील निश्चित करून घेणे गरजेचे आहे. त्याआधारावर मग भूजल व्यवस्थापनाची घडी बसवून घ्यावी लागेल. नाहीतर तुषार शाह (भूजलाचा अभ्यास करणारे एक ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ) यांनी म्हंटल्याप्रमाणे ही अराजकता भूजलाचा सर्वंकष समाचार घेऊनच थांबेल आणि म्हणून ही दिशा बदलून एका सकारात्मक परिस्थितीकडे न्यावे लागेल.


भूजल व्यवस्थापन करायचे आहे, पण पावसाची माहिती नाही मग कसे करायचे?

भूजल व्यवस्थापनासाठी एक महत्वाची बाब म्हणजे पावसाची माहिती. आपल्या शिवारात, पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसापैकी काही टक्के पाऊस हा आपल्या भूगर्भामध्ये मुरतो. आपल्याला तो भूजलधारकांमध्ये आढळतो आणि त्याचा वापर भूजल म्हणून आपण करतो. त्यामुळे अनेकदा असा प्रश्न समोर येतो की आपल्या गावातील पाऊस माहित नसेल तर भूजलाची माहिती कशी होणार? पाण्याचा ताळेबंद कसा मांडणार? आणि पावसाच्या माहितीच्या अभावाने प्रक्रिया सुरु होण्याआधीच अनेकदा थांबते!

800px-Rain_Gauge_-_Kolkata_2012-01-23_8706
पर्जन्यमापक यंत्र (स्रोत: विकी कॉमन्स)

अर्थात गावाच्या पातळीवर पाऊस मोजणे तसे काही कठीण नाहीए. एखादे पर्जन्यमापक गावामध्ये बसवले की आपल्याला पाऊस मोजता येतो. पर्जन्यमापक एक असे यंत्र असते की ज्यामध्ये आपल्याला आपल्या शिवारात पडलेला पाऊस मिलीमीटर (मिमी) मध्ये मोजता येतो. पण हे पर्जन्यमापक बसवणार कोण? प्रत्येक गावामध्ये एक पर्जन्यमापक असायला काहीच अडचण नाही, पण तसे काही धोरण अजून कोणत्याही शासनाने आखलेले नाही. त्यामुळे आजच्या घडीला महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याची पर्जन्य माहिती ही सर्कल (कृषी सर्कल- ८-१० गावांचा समूह) या पातळीवरच उपलब्ध आहे. त्याची माहिती इथे मिळेल. असे म्हणतात की पाऊस गावा-गावात बदलतो, इतकेच काय तर एखाद्या गावाच्या शिवारात देखील हा बदल आढळतो. असे असतांना स्थानिक पातळीवर पावसाची नोंद नसेल तर त्याचा कितपत उपयोग आहे हा चर्चेचा विषय आहे.

आजच्या आपल्या प्रदेशामध्ये पावसाची अनियमितता आणि बदलता स्वभाव बघितला की असे समजते की कदाचित पावसाच्या आधारावर पाण्याचा ताळेबंद मांडणे किंवा त्याआधारावर पुढील वर्षाचे नियोजन करणे धोक्याचे ठरू शकेल कारण:

  • पाऊस बदलला आहे. आधी समजा ५० पावसाचे दिवस (एक पावसाचा दिवस म्हणजे त्या दिवसभरात २.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे) असायचे पण आज ते दिवस ३० ते ५० टक्क्याने कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याचा परिणाम नक्कीच भूजल पुनर्भरण आणि पाणलोटातील जल संवर्धणवर होऊ शकतो.
  • अनेकदा पावसाच्या आधारावर पाण्याचे नियोजन करतांना आपण सरासरी त्या वर्षाचा पाऊस गृहीत धरतो पण हा पाऊस कसा पडलाय हे तितकेच महत्वाचे आहे. उदा. उस्मानाबाद जिल्ह्यातील सरासरी पाऊस ५०० मिमी असेल पण तो जर जुन आणि जुलै या दोनच माहित्यात बहुतांशी पडल्यास भूजल पुनर्भरच्या दृष्टीने तो कितपत उपयुक्त ठरेल? हा महत्वाचा प्रश्न आहे.
  • सरासरी पावसाच्या गणितामध्ये आपण फसू शकतो. त्यापेक्षा पाण्याच्या परिस्थितीचे जास्त अचूक प्रतिनिधित्व ही भूजलाची पातळी करू शकेल. अर्थात ती प्रक्रिया नीट करावी लागेल तरच त्याचा उपयोग आपण पाण्याचा ताळेबंद आणि नियोजनात करू शकू.

गावपातळीवर पावसाची माहिती नसल्यास भूजलाचे आणि एकूणच गावातील पाण्याचे नियोजन आम्ही करायचे तरी कसे? इथे आपल्याला आपल्या गावामधील शिवारातील विहिरींचा उपयोग करून घेता येईल. पुढे समजून घेऊया.


पावसाची माहिती नाही? हरकत नाही, आपल्या विहिरींकडे बघा!

20140802_140506
बऱ्याच गावांमध्ये विहिरी ह्या परंपरागत चालत आलेल्या पाण्याचे स्रोत आहेत

दोन वर्षांमधील पाण्याच्या पातळीच्या आधारावर आपल्याला आपल्या गावातील पाणी उपलब्धतेचा आढावा घेता येऊ शकतो. समजा आपल्या गावामध्ये रामभाऊ यांची एक विहीर आहे. ही विहीर ते शेतीसाठी वापरतात, प्रामुख्याने रब्बी हंगामामध्ये.  तर २०१८ च्या ऑक्टोबर मध्ये रामभाऊ यांच्या विहिरीतील पाणी पातळी ही जमिनीपासून ३ मीटर खाली होती तर हीच पातळी ऑक्टोबर २०१९ मध्ये १.५ मीटर होती. याचाच अर्थ हा की २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये भूजलाचे पुनर्भरण जास्त चांगले झाले आहे असे म्हणता येईल. आपण असे यासाठी म्हणू शकतो कारण दोन वर्षांमध्ये बाकी काहीच बदलले नाही म्हणजेच विहीर बदलली नाही, जमिनीखालील खडक बदलले नाही, विहिरीचा व्यास, त्याची खोली बदलली नाही, तसेच विहिरींची जागा देखील बदलली नाही! याचाच अर्थ बदलली फक्त एकाच गोष्ट- पडलेला पाऊस आणि मुरलेले पाणी! त्यामुळे विहिरिंचा वापर करून आपण आपल्या गावामधील पाणी व्यवस्थापनाची सुरुवात करू शकतो.

पण मग दोन महत्वाचे प्रश्न उपस्थित होतात पुढीलप्रमाचे: रामभाऊ यांची एकट्याची विहीर सर्व पाणलोटाचे प्रतिनिधित्वकरू शकते का? तसेच एकाच विहिरीच्या निरीक्षणाच्या आधारावर इतके मोठे अनुमान (की भूजल पुनर्भरण वाढले किंवा असे इतर) आपण लावू शकतो का?

तर वरील दोन प्रश्नांचे उत्तर हे नाही आहे. पण निराश होण्याचे कारण नाही कारण या दोन्ही प्रश्नांसाठी आपण आपल्या पातळीवर उत्तर मिळवू शकतो. कसे ते बघूया.

१. पाणी पातळी मोजणीसाठी पाणलोटातील प्रत्येक भागामधील विहिरींची निवड करावी. त्यासाठी पुढील दोन सूत्र/ फॉर्मुला आपण वापरू शकतो-

अ. गावामधील एकूण विहिरींपैकी १० टक्के विहिरींची निवड करावी. म्हणजेच गावामध्ये २०० विहिरी असतील तर सुमारे २० विहिरी निवडाव्या. फक्त या विहिरी निवडतांना इतकीच काळजी घ्यायची की या विहिरी गावातील/पाणलोटातील विविध भागांमधील असतील जेणेकरून त्याप्रकारे पाणलोटाचे अचूक असे प्रतिनिधित्व होईल.

ब. दुसरी एक पद्धत म्हणजे प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रात दोन ते तीन विहिरी निवडाव्या. एक चौरस किलोमीटर म्हणजेच १०० हेक्टर क्षेत्रफळ झाले. तर प्रति ३०-५० हेक्टर मध्ये १ विहीर अश्याप्रकारे विहिरी निवडा. उदाहरण- एका गावाचे क्षेत्रफळ ८०० हेक्टर आहे तर त्या गावामध्ये १६ ते २० विहिरी पाणी पातळी मोजणीसाठी ठरवून घ्याव्या.

यामध्ये काही प्रश्न पुढे येतात. अनेकदा आपण बघतो की गावाच्या एका ठराविक भागामध्ये जास्त विहिरी आहे तर पाणलोटाच्या वरच्या भागामध्ये किंवा खडकाळ भागामध्ये जिथे जास्त शेती होत नाही तिथे कमी विहिरी आहेत. तर अश्यावेळी आपण स्थानिकांशी चर्चा करून जास्त विहिरी असलेल्या भागामधील विहिरी थोड्या जास्त प्रमाणात निवडा. पण हे लक्षात ठेवावे की पाणलोट क्षेत्राच्या इतर भागातील विहिरी देखील मोजणीसाठी घ्याव्या.

तसेच विहिरी निवडतांना आपल्याला सर्व प्रकारच्या विहिरी निवडता येतील ही काळजी घ्यावी. सिंचनाच्या विहिरी, पिण्याच्या पाण्याची विहीर, सार्वजनिक विहीर, वापरात नसलेल्या विहिरी देखील मोजणीसाठी घ्याव्या.

२. निवडलेल्या सर्व विहिरींमधील पाणी पातळी मोजून त्याची सरासरी घ्यावी. म्हणजेच फक्त रामभाऊ यांची विहीर न घेता अश्या २० विहिरींमधील पाणी पातळीमध्ये दोन वर्षांमध्ये काय बदल झालाय या आधारावर आपल्याला तिथल्या भूजलाचे अनुमान जास्त अचूकपणे मांडता येईल.

a
दोन वर्षांमधील सरासरी पाणी पातळीतील बदलाच्या आधारावर आपल्याला अचूक जल नियोजन करता येऊ शकेल

विहिरीच का?

१. विहिरींचा वापर शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो. अनेक गावांमध्ये पाण्याचा मुख्य स्रोत विहिरी असतात त्यामुळे त्या योग्य ठरतात.

२. आपल्याला भूजलधारक दिसत नाही. पण विहिरींच्या माध्यमातून भूजलधारक आपल्याशी ‘बोलतात’ असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्यातील पाण्याच्या चढ-उतारावरून आपण भूजलधारकाच्या स्थितीचा आढावा घेणे शक्य होते.

३. पाणलोक क्षेत्रातील वेगवेगळ्या भागामध्ये विहिरी पसरलेल्या असतात. त्यामुळे त्या पाणलोटाचे उचित प्रतिनिधित्व करतात.

४. सगळ्यात महत्वाचे म्हणजे विहिरींमधील पाणी पातळी मोजणे काहीच कठीण नसते. एका मीटर टेपचा वापर करून आपण हे सध्या करू शकतो. तसेच पाणी दिसत असल्यामुळे हे काम अजून सोप्पे होते.

५. पाऊस कितीही आणि कसाही पडला तरी शेवटी त्याचे भूजल पुनर्भरणामध्ये किती रूपांतर झाले हे आपल्या दृष्टीने महत्वाचे आहे. आणि भूजल पुनर्भरण मोजायचे एक सोपे स्वरूप म्हणजेच विहिरींमधील पाण्याची पातळी!


सामूहिक निर्णयांची गरज

आज प्रत्येक शेतकरी आपल्या विहिरीकडे बघूनच पिक-पाण्याचे नियोजन करतो. फक्त होतं असं की तो शेतकरी फक्त आपल्याच विहिरीकडे बघतो. जमिनीखालील भूजलधारक हा अनेक विहिरींना सामायिक असल्यामुळे आपल्याला फक्त एका विहिरीकडे बघून नियोजन करणे अपूर्ण ठरेल. त्यामुळे इथे सामूहिक निर्णयांची आणि कृतीची गरज भासते. अनेक सामूहिक संसाधनांप्रमाणेच भूजल देखील सर्वांचे आहे कारण भूजलधारक कोणत्याही सात-बाराच्या, जमिनीच्या, गावांच्या, सामाजिक समूहांच्या सीमांनी बांधलेला नसून त्याला आपले एक नैसर्गिक स्वरूप आहे, स्थान आहे. त्यामुळे आपल्याला भूजलाचे नियोजन आणि व्यवस्थापन करायचे असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन ते करावे लागेल नाहीतर अराजकता माजायला वेळ लागणार नाही. काही उदाहरणांनी समजून घेऊया.

एखाद्या गावाच्या शिवारात जर कोणत्यातरी शासकीय किंवा अशासकीय संस्थेच्या माध्यमातून जर एक माती बांध किंवा सिमेंट बांध नाल्यामध्ये बांधण्यात आला तर ठराविकच शेतकऱ्यांच्या विहिरीला त्याचा फायदा होणार नसून त्या बंधाऱ्याच्या प्रभाव क्षेत्रातील सर्व विहिरींना तो फायदा होईल. मग विहिरी लहान शेतकऱ्याची असेल, मोठ्या शेतकऱ्याची असेल किंवा वेग-वेगळ्या जातीधर्माच्या शेतकऱ्यांची असू शकेल. ही नैसर्गिक आणि जल शास्त्रीय बाब आपल्याला समजून घ्यावी लागेल.

तसेच, आपल्या विहिरीकडे बघून एखाद्या शेतकऱ्याने आपल्या सर्व शेतामध्ये गहू घ्यायचा ठरवलं तर त्याचा परिणाम आजूबाजूच्या शेतकऱ्यांवर देखील होईल. मग बाजूच्या शेतकऱ्याचे कदाचित हरभरा जरी लावला असेल तर त्याच्या सिंचनाइतके देखील पाणी त्याच्या विहिरीत राहणार नाही. म्हणून आपल्या विहिरीकडे फक्त बघून उपसा केला तर आपण तर फायद्यात येऊ पण गाव म्हणून, गावातील भावकी म्हणून आपण सर्व अडचणीत येऊ.

वरील उदाहरणांमधून आपल्याला हेच कळतं की जेव्हा आपण पाणलोटाच्या पातळीवर, गावाच्या पातळीवर जल नियोजन करायचे ठरवतो तेव्हा सर्वांचा सहभाग आणि सहकार असणे महत्वाचे आहे. फक्त सहभाग असून चालणार नाही तर निर्णयांमध्ये आणि त्यातून उमगणाऱ्या कृतीमध्ये सहकार असणे तितकेच गरजेचे ठरेल. असे म्हणायचे (आणि आजदेखील म्हणतात) की शेतकऱ्याचा डोळा लागला असतो आकाशाकडे, कधी पाऊस पडेल म्हणून. पण शाश्वत जल व्यवस्थापनाच्या दिशेत जायचे असेल तर आज त्याला खाली, आपल्या विहिरीत बघावे लागेल. जमिनीतील या अलौकिक आणि गुप्त अश्या संसाधनाचे व्यवस्थापन करणे हे अश्या सर्व शेतकऱ्यांच्याच सामूहिक दृष्टीमध्ये दडलेले आहे.

आभार: ACWADAM मधील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे ज्यांच्याकडून हे शिकायची संधी मिळाली तसेच अनेक ग्रामस्थ ज्यांनी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते समजावण्यासाठी मला संमती दिली.

 

 

 

 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s