गेल्या महिन्यात विद्यापीठातील एका कोर्सच्या विद्यार्थ्यांना ‘भूजल आणि सामाजिक-राजकीय व्यवस्था’ या विषयावर लेक्चर देत असतांना एका विद्यार्थिनीने ‘भूजलाचा अभ्यास करतांना अभ्यासकाच्या पोझीशनॅलिटी चा काही परिणाम होतो का? असे विचारले. हे काय नवीन लफडं आहे- तुम्ही विचाराल? पोझीशनॅलिटी म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक-राजकीय-विचारधारा-जात- वर्ण- लिंग यांचा त्याच्या अभ्यासावर किंवा त्याच्या अभ्यासाच्या विषयाबद्दल असलेल्या दृष्टिकोनाबद्दल होणार परिणाम. तुम्ही काबुल करा किंवा नका करू पण याचा परिणाम होत असतो. उदाहरणाने स्पष्ट करतो- मी जेव्हा phd चे माझे क्षेत्रकार्य उस्मानाबाद मधील काही गावांमध्ये करत होतो तेव्हा मला गावामधील पारावर, टपऱ्यांवर जाऊन पुरुषांशी (अश्या ठिकाणी शक्यतो पुरुषच असतात) गप्पा मारता येत होत्या. आता हे सहज वाटत असले तरी पुरुष म्हणून मला त्या जागा (स्पेस- स्पेसेस) सहज ऍक्सेसिबल- रिचेबल वाटल्या – तिथे जाण्याविषयी कसलाही संकोच बाळगण्याची गरज वाटली नाही. यामध्ये मी पुरुष आहे म्हणून मला ते सहज वाटले हे नमूद करणे महत्वाचे आहे. तसेच तिथे बसलेल्या मंडळींना म्हणजेच पुरुषांना याबद्दल काही वेगळे किंवा नवल वाटले नाही कारण हि एक ‘सहज’ प्रक्रिया होती. पण एक स्त्री अभ्यासिका (ती जाऊ शकतेच यात वाद नाही) अश्या जागांना सहज ऍक्सेस करू शकेल असे वाटत नाही. याला म्हणतात एखाद्याच्या पोझिशन-पोझीशनॅलिटी चा त्या अभ्यासावर होणार परिणाम. यामध्ये फक्त अभ्यासक म्हणून तुम्हीच नाही तर ज्याच्याबरोबर तुम्ही तो अभ्यास करताय त्यांच्या विचारांचा, दृष्टिकोनाचा परिणाम देखील होत असतो.
तर त्या वर्गामध्ये विचारलेल्या प्रश्नावर मी जातीचा आणि वर्गाचा परिणाम भूजलाच्या उपलब्धतेवर किंवा ऍक्सेस वर कसा होतो हे समजावून सांगितले. हे सांगतांना माझ्या जन्मजात जातीचा (ब्राह्मण) उल्लेख करून मी सहज बोलून गेलो- ‘मी जात मानत नाही’. माझी धारणा हीच की जर मी जात मानत नाही तर त्यामुळे त्याचा परिणाम माझ्या दृष्टिकोनावर आणि अभ्यासावर होणार नाही. पण तसे नाहीए. फक्त तुम्ही जात मानून किंवा न मानून चालणार नाही. कारण जात ही एक सामाजिक व्यवस्था आहे. त्यामुळे तुम्ही जरी त्याचा धिक्कार केला तरी ज्या समाजात तुम्ही वावरता त्यामध्ये त्याचा उपयोग (लौकिक दृष्ट्या नाही जरी) होत असतो म्हणून तर तुमची त्यातून सुटका नाही. सहज आपल्या लहानपणीच्या मित्र-मैत्रिणींची नाव-आडनाव आठवून बघा. आपण केलेले लग्न/जोडीदार , आपल्या मुलांवरील संस्कार, याकडे लक्ष दिले तर सहज लक्षात येते की आपण एका व्यवस्थेचे भाग आहोत म्हणून आपल्या ‘चॉइसेस’ ह्या ‘फ्री विल’ वगैरे नसून त्या ठराविक साच्यातून-संबंधांमधून निर्माण झालेल्या असतात. जात हे त्यातील एक वास्तव. हे वास्तव तुम्ही जरी नाकारले तरी ज्या समाजात तुम्ही राहता, वावरता त्यामध्ये त्याला किंमत आहे, उपयोगिता आहे (अर्थात, तुम्ही जर एकटे एखाद्या गुहेत वगैरे जाऊन राहिलात तर सोडून द्या). जातीशी माझा संबंध आणि अनुभव काय ते यानिमित्ताने मांडतोय. त्याचा पाणी, शेती अश्या नैसर्गिक किंवा टेक्निकल समजल्या जाणाऱ्या गोष्टींशी कसा संबंध येतो ते देखील थोडक्यात मांडतोय.
म्हणतात ना- ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. PhD ला यायच्या आधी मी भूजलाच्या कामानिमित्त भारतातील विविध भागांमध्ये फिरलो- त्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्रातील तर अनेक गावांमध्ये, प्रदेशांमध्ये काम करायची संधी मिळाली. मला नीट आठवतं की जेव्हा प्रत्येक वेळी मी कोणत्याही गावामध्ये गेलो तर मला नाव विचारायचे (ही गोष्ट शहरांमध्ये देखील तितकीच सर्रास आहे.). मी फक्त ‘धवल’ असे सांगायचो. लोक थोडे थांबायचे आणि न राहवून विचारायचे- धवल कोण? माझ्या आडनावाची चाचपणी करायचा प्रयत्न नेहमी व्हायचा. अनेक ठिकाणी मी धवल वर निभावून न्यायचो. वेळ आलीच तरी ‘जोशी’ असे सांगायचो. जोशी असण्याचा प्रश्न नाही पण जर जोशीपणा करून माणसातील माणूस म्हणून मी या जगाकडे पाहू शकत नसेन तर मला अश्या जगामध्ये काहीतरी चुकल्यासारखे वाटते. तसेच समोरच्याने मला ‘जोशीपणाच्या’ कक्षेत बसवले तर त्यांचे माझ्याविषयीचे मत, व्यवहार यावर त्याचा (चांगला-वाईट) परिणाम होईल.
जातीव्यवस्था जरी आपल्या आयुष्यात भिनलेली असली तरी त्याचे वास्तव किंवा आपल्या जातीची जाणीव काही अनुभवांमधून आपल्याला होत असते. शाळेमध्ये असे पर्यंत मलातरी याची जाणीव कधीच झाली नाही (सवर्ण असल्याने असू शकेल). पण दोन घटना अश्या घडल्या की ज्यातून मला जातीव्यवस्थेचे वास्तव भिडले. पर्यावरण शास्त्राचा अभ्यास आणि आवड असल्याने आमच्या कल्याण मधील डम्पिंग ग्राउंड वरती अनेकदा चकरा झाल्या. हा एक टेक्निकल प्रश्न आहे आणि तो टेक्निकली म्हणजेच टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने सोडवला पाहिजे अशी धारणा होती. अनेकदा फेऱ्या झाल्यावर उमगले की यामध्ये एक सामाजिक व्यवस्था दडली आहे. अजून खोलवर गेल्यावर कळले की काही ठराविक जातींमधील लोक या कामामध्ये आहे. मग लक्ष द्यायला लागलो आणि उमगले की कचरा उचलणाऱ्या गाड्या- त्यावर काम करणारे लोक, डम्पिंग ग्राउंड जवळील वस्ती ही सर्व काही ठराविक जातीच्या लोकांची आहे. म्हणजे थोडक्यात आपण आधुनिकता- (कचरा आणि डम्पिंग ग्राउंड ही आधुनिक म्हणवणाऱ्या शहरांमधीलच व्यवस्था आहेत)- स्वीकारली तरी त्याला नीट, हळुवार पणे शतकांपासून चालत आलेल्या जातीव्यवस्थेत बरोबर नेऊन बसवले. हे जसे कळले तसे टेक्नॉलॉजी, सायन्स याबद्दल थोडा क्रिटिकल झालो. म्हणजे हे महत्वाचे वगैरे आहेच, पण ज्या सामाजिक-आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेत हे उपजतात त्याबद्दल जाणीव निर्मिती नसेल तर ‘अमुक अमुक टेक्नॉंलॉजीने गोष्टीने हा प्रश्न सुटेल’ अशी simplistic धारणा होऊ शकते.

दुसरा अनुभव म्हणजे मी आणि माझा मित्र किरण असे दोघेजण मिळून काही अभ्यासवर्ग किंवा क्लासेस चालवत होतो. त्यामध्ये काही मुलांना बोलतांना किंवा व्यक्त होतांना अडचणी येत, पण तेव्हा जाणवले नाही की यामागे अनेक शतकांची रचना कारणीभूत असेल. जेव्हा आपण आपल्या करिअरच्या प्रवासाविषयी बोलतो तेव्हा सहज म्हणतो- मी इथवर आलो ते माझ्या मेहनतीवर वगैरे. हे सगळे बरोबर आहे पण जसे शाहरुख खान म्हणतो की जब तुम कुछ दिल से चाहो तो सारी कायनात तुम्हे वो दिलानेकेलीये काम करती है’ असे काही. हे कायनात का काय म्हणतात ते काय असतं हे माहित नाही पण अश्या ज्या ‘इतर’ गोष्टी आहेत त्यामध्ये तुमचे नेटवर्क्स जे तुमच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीतून निर्माण होतात. नक्कीच मेहनतीला इथे मी कमी लेखत नाहीए पण एखाद्याच्या यशामध्ये अश्या contextual गोष्टींचा मोठा वाटा असतो. उदा. तुम्ही शाळेत असतांना तुमचे शिक्षक तुम्हाला थोडा उजवा भाव देतात हे आपल्याला तेव्हा लक्षात येत नाही पण स्वाभाविक पणे त्याचे परिणाम दूरवर होतात. अनेक लोक रिझर्वेशन बाबतीत बोलतात. मित्रांमधील चर्चेत ऐकायला येते- ‘या लोकांना’ पण त्याच कॉलेज मध्ये भेटले ऍडमिशन मग काय प्रॉब्लेम आहे वगैरे. पण आपल्या घरामधील अभ्यासासाठी पोषक वातावरण हे लोक विसरतात. तुमच्या पालकांमध्ये (अनेक सवर्ण) शिक्षणाबद्दल प्राधान्य अधिक असेल कारण तुमच्या २-३ पिड्यांनी त्याचा फायदा उपभोगला आहे, बघितला आहे. हेच दलित विद्यार्थ्यांबाबत बोलता येऊ शकत नाही. अनेकांच्या घरामध्ये तसे पोषक वातावरण नसते आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर, शाळेवर होतांना दिसतो. अनेक अभ्यास याबद्दल झालेले आहे. (सांगायला आनंद होतो की या प्रश्नांवर काम करणारी एक संस्था आता कल्याणात आहे. सजग संस्थेचे काम अतिशय महत्वाचे आहे. तुम्ही देखील नक्कीच त्यांच्या कामाचा मागोवा घ्या आणि जमल्यास या कमला होईल तितके सहकार्य करा.)
भूजलाला कुठे आली जात?
पाण्याला जात नसती तर बाबासाहेब आंबेडकरांना १९२७ मध्ये चवदार तळ्यावर जाऊन पाणी ओंझळीत घेण्याची काहीच गरज नव्हती. आजदेखील अनेकदा आपण बघतो की गावांमध्ये इतकेच काय शहरांमध्ये देखील पाण्याची व्यवस्था ही वर्गवारी वेगवेगळी असते. भारतात जातीचे आणि वर्गाचे असे वेगळेच रसायन तयार होते आणि त्यातून अशी एक सामाजिक आर्थिक परिस्थिती निर्माण होते. माझ्या क्षेत्रकार्यात आलेले काही अनुभव आणि त्यातून जातीचा आणि पाण्याचा कसा संबंध लागला याबद्दल दोन अनुभव मांडतो.
मराठवाड्यामध्ये आपल्याला गावोगाव आड दिसतात. असेच उमरग्यातील मधील एका गावामध्ये गेलो असता, हे आड जातीनिहाय वेगवेगळे आहेत हे आपल्याला दिसते. याचे कारण आपली गावं जातीच्या पातळीवर रचलेली असतात. त्यामुळे हा मराठ्यांचा आड, हा ब्राह्मणांचा आड, हा महारांचा आड, दलित वस्तीतील आड, अमुक वस्तीतील आड असे मला गावामध्ये दिसले. जमिनीखालील भूगर्भीय रचना जरी एक असली तरी जमिनीवर अशी जातनिहाय स्त्रोतांची रचना गावांमध्ये दिसली. अनेक गावांमध्ये आजदेखील ही कटाक्षाने पाळली जाते.

काही शेतकऱ्यांचा इंटरव्युव्ह घेत असतांना चर्चेत जेव्हा मजुरांचा विषय निघाला तेव्हा काही ठराविक जातीतील लोकांचं उल्लेख झाला. एका सवर्ण महिला शेतकऱ्यांशी बोलतांना ‘कांबळेच्या बाया’ असा उल्लेख झाला म्हणजेच गावामधील कांबळे समाजातील बायका मजुरीला येतात. वाडीवरील बाया (आदिवासी समाजातील) देखील मजुरीला येतात. इथे मला जेंडरचा प्रश्न दिसला. दलित समाजामधील महिला ह्या आपल्या सामाजिक रचनेमधील सर्वात कठीण किंवा पिचलेला वर्ग. महिलांच्या मजुरीच्या जोरावर आपल्याला आपली शेतीव्यवस्था टिकवता येतेय आणि तरीदेखील शेतीचे नाव घेतल्यास किंवा त्यातील दैनंदिन निर्णय म्हंटले की आपण आपसूकच पुरुषांकडे जातो. मजुरीमध्ये थेट दुप्पट दुजाभाव केला जातो. पुरुषांना जितकी मजुरी त्याच्या अर्धी किंवा निम्मी महिलांना अनेक ठिकाणी मिळते.
एका अभ्यासकाने हे दाखवून दिले आहे की पाणी व्यवस्थापनामध्ये सध्या प्रचलित ठिबक आणि तुषार सिंचन हे जल अभ्यासकांच्या दृष्टीने ‘एफिशिअंट’ ठरते याचे कारण आहे महिला मजुरीचे शोषण. मला तर वाटायला लागले आहे की आपल्या शेती व्यवस्थेचा कणा ह्या महिला मजुरीवर अवलंबून आहे. यातून आपल्याला जात, जेंडर, संसाधनं (पाणी, जमीन इ) आणि अर्थकारण ह्याच्या क्लिष्ट संबंधांची कल्पना येते.
वरील अनुभवांमधून आपल्याला आपल्या पोझीशनॅलिटी चे आकलन होते आणि आपण आपल्या कॉन्टेक्स्टचा किंवा पार्श्वभूमीची जाणीव अधिक बळकट करून एक चांगले अभ्यासकच नाही तर एक चांगला व्यक्ती देखील होऊ शकतो. बाबासाहेबांना अश्याच समतेवर, बंधुतेवर आधारित समाजाची अपेक्षा होती आणि तिथे जाण्यासाठी करायच्या विविध गोष्टींमध्ये एक आहे आपल्या पोझिशनविषयी थोडी जाणीव निर्मिती करणे. जात व्यवस्थेचा धिक्कार तर आहेच पण नुसता धिक्कार करून किंवा ‘मी मानत नाही’ असे सिम्पलीस्टीक बोलून चालणार नाही. यासाठी स्वतःमध्ये बदल घडणे गरजेचे आहे. आपल्याविषयी, आपल्या पोझिशन विषयी जाणीव वाढली तर ते शक्य होईल असे वाटते.
मी जात मानत नाही पण…
‘मी जात मानत नाही’ असं वरवर बोलायला गेलं तरी आपल्या घडणावळीत जाती संस्थेचा खुप मोठा वाटा आहे . दैनंदिन आयुष्यात पण जाती संस्थेचा खुप प्रभाव पडतो. पोझीशनॅलिटी बद्दल या लेखातुन माहिती मिळाली . भुगर्भातील पाण्याच्या अभ्यासाच्या अनुभवातुन या विषयाची खोली खुप छान मांडलीत . सुरेख लेख . आणि हो , ‘ जात मानत नाही’.
LikeLike