पाणलोट, जलधर आणि भूजल: परस्परसंबंध आणि नात्यांमधील प्रश्न (भाग १)

काही वर्षांपूर्वी मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात, लातूरच्या भूजल कार्यालयात गेलो असता तिथल्या सरांशी चर्चा करायची संधी मिळाली. इतर अनेक कार्यालयांप्रमाणे हे देखील एक कार्यालय. काचेने व्यापलेले टेबल, त्यावर काही फायली आणि पलीकडे बसलेले सर. वर गर गर फिरणारा पंखा ‘तुम्ही लातूर मध्ये आहेत’ याची प्रचिती करून देत होता. मी ज्या संस्थेत काम करत होतो त्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील काही गावांमध्ये एक कार्यक्रम राबवण्यात येत होता. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी ही भेट होती. आपल्या कामापलीकडे जाऊन सरांनी अनेक लेख लिहिले होते, चर्चासत्रांमध्ये मांडणी करत असत. मोठा अनुभव त्यांचा पाठीशी असल्याचे सहज कळून आले. चर्चा चांगलीच रंगली होती.  

तेवढ्यात तिथे एका तालुक्याच्या पंचायत समितीचे सदस्य आले. त्यांचा प्रश्न असा कि त्यांच्या भागातील काही गावांना नवीन विहीर घेण्यास बंदी आहे. त्यावर साहेबांनी त्यांना सांगितले की त्या गावांचा समावेश अतिशोषित पाणलोटात होतो. यावर ते म्हणाले की त्यांच्याकडे तर पाणलोटाची कार्यक्रम झाला आहे. त्यावर थोडे गडबडून मग समजल्यावर साहेब म्हणाले की ते एका पाणलोट या जलवैज्ञानिक व्याख्येबद्दल बोलत आहेत तर आलेले सदस्य हे पाणलोट विकास या कार्यक्रमाबद्दल बोलत आहे. यावर ते सदस्य म्हणाले की ते ठीक आहे पण मग आमच्या तालुक्याचा लगतच्या दुसऱ्या तालुक्यातील गावांमध्ये देखील कशापायी बंदी. तर यावर साहेबांनी सांगितले की याचे कारण पाणलोट हे आपल्या प्रशासकीय-राजकीय सीमांच्या पलीकडे जातो, त्याच्या सीमा या नैसर्गिक परिस्थितीवर ठरतात, प्रशासकीय नाही. म्हणूनच दोन आजूबाजूच्या तालुक्यातील गावं अतिशोषित ठरू शकतात याचे कारण तो पाणलोट अतिशोषित आहे.  

यामधील अतिशोषित हा शब्द वगळता अनुभव लक्षात घेतला तर कळेल की जसे सरांचे रूपांतर साहेबांमध्ये झाले तसेच पाणलोट देखील ‘नैसर्गिक संरचनेतून’ एका ‘कार्यक्रमात’ चर्चेमध्ये रूपांतरित झाला. माझ्यासाठी हा अनुभव अतिशय महत्वाचा ठरला. वेगवेगळे लोक, समूह एकाच शब्दाकडे, गोष्टीकडे कश्या पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपात, अर्थाने पाहतात आणि मग खरंच तो शब्द, ती गोष्ट एकच राहते का असा प्रश्न मला नंतर गोड गोड चहाचे घोट घेतांना पडला.  

महाराष्ट्रामध्ये पाणलोट हा शब्द जल व्यवस्थापनाच्या दैनंदिन कार्यप्रणालित अत्यंत मुरलेले असा शब्द आहे. वरील उदाहरणातून दिसते की पाणलोट या शब्दाचा उपयोग किंवा पाणलोटाकडे बघण्याचा दृष्टिकोण वेगवेगळा आहे. पण तुम्हाला माहित आहे का की महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच दशकांपासून जास्त काळ पाणलोट आणि भूजलाचा असा परस्पर संबंध राहिला आहे ? किंबहुना महाराष्ट्रातील आधुनिक भूजल ज्ञाननिर्मितीचा पाया किंवा बेसिस किंवा त्या माहितीनिर्मितीचे एकक म्हणून विचार केला तर तो पाणलोट आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. 

या लेखामध्ये मी पाणलोट आणि भुजलाचा मागोवा घेणार आहे. त्यानिमित्ताने जलधर म्हणजे एक्वीफर याचादेखील समावेश केला आहे. भूजल हे जमिनीखालील खडकांच्या भेगांमध्ये, फटींमध्ये, त्यातील छिद्रांमध्ये आढळते- तिथे ते साठते आणि त्यातून त्याचे वहन होते. अश्या खडकांची एकसंध रचना म्हणजेच जलधर किंवा ऍक्विफर. ही व्याख्या पूर्ण नाही. अश्या सर्वच खडकांची संरचना जलधर होत नाही तर ज्यातून मानवी उपयोगासाठी पुरेसे पाणी आढळेल किंवा उपसता येईल अश्या संरचनांनाच आपण जलधर म्हणू शकतो. हा थोडा मानवी स्वार्थ सुरुवातीला काही भूजल शास्त्रज्ञांनी जलधराच्या संकल्पनेत घुसवला हे इथे म्हणता येईल. तर अश्या ऍक्विफर आणि भूजल यांचा पाणलोटाशी परस्परसंबंध काय आणि हे नातं इतकं साधं सरळ आहे का त्यामध्ये काही गुंतागुंत आहे हे मी या लेखाच्या माध्यमातून तपासणार आणि मांडणार आहे.  

पाणलोट, एक जलवैज्ञानिक व्याख्या, कार्यक्रम नव्हे  

सुरुवातीलाच स्पष्ट करतो कि पाणलोट या शब्दाचा वापर इथे एक जल विज्ञानातील व्याख्या म्हणून करत आहे. आपल्यापैकी अनेकांना पाणलोट कार्यक्रम किंवा पाणलोट विकास या शब्दांची माहिती कानावर पडली असेल. ७-८ वर्षांमागे दस्तुरखुद्द अमीर खान यांनी मराठी वाहिनीवर येऊन आपल्या सर्वांना पाणलोट काय असते आणि पाणलोट विकास म्हणजे नक्की काय हे सांगितले होते. त्यामुळे का होईना पाणलोटाची व्याख्या किंवा पाणलोट विकास कार्यक्रम हे शब्द आपल्या कानावर पडले असतीलच.  

संदर्भ : पानी फाउंडेशन  

अमीर खान यांच्या आधी अनेक दशकं पाणलोट विकासाचे काम किंवा या दिशेने प्रयत्न अनेक शासकीय, अशासकीय माध्यमातून, संस्थांमधून झालेले आपल्याला दिसतात. अनेक अभ्यासकांनी आणि प्रत्यक्ष गाव पातळीवर किंवा ‘ग्राउंडवर’ काम करणाऱ्या अनेक practitioners यांनी पाणलोटाचा मागोवा घेतला आहे, अनेक मॉडेल्स केली आहेत, त्यादृष्टीने अनेक कार्यक्रम आखले आहेत आणि त्यांची अंमलबजावणी केली आहे. एकात्मिक पाणलोट, इंडोजर्मन पाणलोट, वसुंधरा, डीपीएपी, तसेच जलद पाणलोट असे अनेक कार्यक्रम राज्यपातळीवर आखले आणि राबवले गेले आहेत. यामध्ये शासकीय संस्था तर होत्याच पण त्याबरोबरच अशासकीय संस्थांचे मोठे योगदान आहे. अनेक ठिकाणी या कार्यक्रमात बदल करण्यात या संस्थांचा वाटा राहीला आहे. नगर मधील अनुभवांच्या आधारे वॉटर संस्थेने केलेले काम असेल किंवा मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या माध्यमातून जालन्यात झालेले कामं ही त्यातील काही उदाहरण. त्याबद्दल तपशीलवार वाचायचे असल्यास तुम्हाला अनेक रिपोर्ट्स, अभ्यासपूर्ण लेख किंवा विविध मासिकांमध्ये आणि वर्तमानपत्रांमध्ये वाचायला मिळेल.  

पण पाणलोट म्हणजे काय? पाणलोटाची प्रचलित व्याख्या घेऊन त्याआधारावर कार्यक्रम आखले गेले पण खूपच कमी अभ्यासकांनी पाणलोटाच्या व्याख्येचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केलाय. अर्थात पाणलोट म्हणजे काय हे उत्तर तुम्हाला जल विज्ञानाच्या कोणत्याही पुस्तकात मिळेल, डायरीत मिळेल पण महाराष्ट्राच्या संदर्भात याकडे नक्की कसे बघितले गेले. त्याहून महत्वाचे म्हणजे पाणलोट आणि भूजलाचा संबंध कसा बांधला गेला? पाणलोट आणि जलधर यांच्या नात्याबद्दल आपण काय गृहीतके मान्य केली आणि त्याआधारावर भूजलाच्या ज्ञानाची निर्मिती केली- भूजल समजून घेतले? याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखातून मी करतोय. यामध्ये मी त्यांच्या नात्यामधील गुंतागुंत कशी आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील भुजलाच्या महितीवर काय परिणाम होतो हे जाणून घेतोय.  

यामधील भूजलाबाबतीत आणि त्यांच्या जलधरांबाबतीत जाणून घेण्यासाठी मी विशेषतः ज्याला डेक्कन बसाल्ट असे इंग्रजीत म्हंटले जाते त्या खडक रचनांचा संदर्भ घेणार आहे. त्याला आपण मराठीत पाषाण खडक म्हणून जाणतो. अर्थात पाषाण हा खडकाचा एकच प्रकार नसून त्यामध्ये अनेक पोटजाती आहेत. डेक्कन बसाल्ट निवडण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे माझ्या अभ्यासाची व्याप्ती- मी केलेले क्षेत्रकार्य या खडकरचनांच्या प्रदेशात आहे त्यामुळे मी ही मांडणी करू शकतो आहे, करतोय. तसेच दुसरे आणि महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील ८२ टक्के भूभाग हा या खडकांनी व्यापलेला आहे त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी आपल्याला याबद्दल प्रचिती येते. आणि म्हणून अश्या खडकरचनांना एकाच प्रकारच्या मांडणीमध्ये केल्यामुळे त्याचा परिणाम यांच्या आधारावर ठरवलेल्या कार्यक्रमांवर आणि धोरणांवर होतांना आपल्याला दिसतो. म्हणून देखील हे ऍनालिसिस महत्वाचे वाटते. 

८२ टक्के राज्य डेक्कन बसाल्ट खडकांनी व्यापले आहे   (भूजल मूल्यांकन अहवाल २०१४ मधून)  

पाणलोट म्हणजे काय?  

पाणलोटाच्या अनेक व्याख्या आहेत. थोडक्यात एका परिसरातील सर्व भूस्तरीय (जमिनीवरील पाणी) जलप्रवाह ज्या एका ठिकाणी येतात त्या सर्व परिसराला एक पाणलोट क्षेत्र किंवा पाणलोट म्हणून संबोधले जाते. यामुळे पाणलोट हे भूस्तरीय किंवा सर्फेस वॉटर व्यवस्थापनातील आणि शासनातील सर्वात छोटे एकक किंवा घटक. अनेक छोटे पाणलोट मिळून एक मोठा पाणलोट बनतो आणि असे अनेक मोठे पाणलोट मिळून एक नदी खोरे बनते. पाणलोटामध्ये माथा ते पायथा याला खूप महत्व दिले गेले आहे. याची प्रचिती आपल्याला पाणलोट कार्यक्रमात देखील झालेली दिसते. पाणलोटाची आखणी कशी केली जाते? सामान्य ज्ञानातून एखाद्या शिवारातील वरचा भाग किंवा आमच्या गावांमध्ये म्हणतात तसे उमाटा तसेच त्या शिवारातील खालचा भाग ज्याला झोळ म्हणतात ह्याचा अंदाज बांधून करता येतो. पण अनेकदा टोपोशीट ह्या नकाशाचा उपयोग केला जातो. टोपोशीट सर्वात पहिले ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतात रुजवली आणि आपण ती पुढे चालू ठेवली. अंत्यंत माहितीने भरलेला असा हा नकाशा १: ५०००० (म्हणजे नकाशावरील १ सेंटीमीटर म्हणजे प्रत्यक्षातील ५०००० सेंटीमीटर) या स्केलवर बनवला जातो. त्यामध्ये पाणलोट मापनाच्या दृष्टीने दोन महत्वाचे भाग असतात- एक म्हणजे कंटूर आणि दूसरे म्हणजे परिसरातील नदी नाले. कंटूर म्हणजे नकाशावरील एका ठराविक उंचीला दाखवणाऱ्या लाईन असतात. त्याचा आधार घेऊन एखादे पाणलोट क्षेत्र निश्चित करता येते. याबद्दल एकदा सविस्तर लिहीन.  

उदाहरण म्हणून ही टोपोशीट बघा. कल्याण-उल्हासनगर आणि परिसर यात दिसतोय.  

भूजल अभ्यासासाठी पाणलोटाची आधार  

महाराष्ट्रात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ही एक महत्वाची शासकीय संस्था आहे. याला आपण लेखामध्ये भूजल विभाग म्हणून संबोधणार आहोत. तर १९७१ मध्ये स्थापन झालेल्या ह्या संस्थेने महाराष्ट्रातील भूजलाचा नियमित अभ्यास केला आहे आणि १९७३ मध्ये पहिल्यांदा पाणलोट संकल्पनेचा उपयोग करून भूजल अभ्यासाला सुरुवात केली. आज भूजलाची माहिती पाणलोट निहाय मिळते, भूजलाच्या मॉनिटरिंग साठी पाणलोट निहाय सर्वेक्षण विहिरींचे जाळे पसरलेले आहे, तसेच भूजलाचे मूल्यांकन देखील पाणलोट पातळीवर होते. आजच्या घडीला राज्यभरामध्ये जवळपास १५३१ पाणलोट क्षेत्र आहेत. सुरुवातीला काही १४८१ होते ते आता वाढले आहेत याचे कारण त्यानंतर वाढलेले जिल्हे. पण पाणलोटाची आणि भूजलाचा असा घनिष्ट संबंध का बरं निर्माण झाला? यासाठी आपल्याला भूगर्भशास्त्रज्ञ भूजल आणि पाणलोटाची सांगड कशी घालतात हे जाणून घ्यावे लागेल. 

दख्खनचा बेसाल्ट खड़क आणि भूजल  

डेक्कन बसाल्ट खडक आणि त्यावरून निर्माण झालेला दक्खनचे पठार याचा उगम काही ६५० लाख वर्षांपूर्वी झाल्याचे कळते. याची रचना विशेष आहे. लाव्हा रसाच्या सातत्यपूर्ण प्रक्रियेतून किंवा निरंतर (एका मागून एक अश्या लावा रसाची उत्पत्ती) प्रक्रियेतून हे अग्निजन्य खडक बनले आहेत. त्यामुळे यामध्ये आपल्याला ‘फ्लो’ म्हणजेच प्रवाह दिसतात. कोणत्याही घाटमाथ्यावर किंवा घाटाखाली उभे राहा आणि एकदा या डोंगरांकडे बघा. यामध्ये आपल्याला ते प्रवाह आढळून येतात. त्यामुळे एका केक मध्ये असलेल्या लेयर्स प्रमाणे आपल्याला हे भासतात.  

तर या प्रवाहांचा आणि ज्या पाणलोटांमध्ये ते आढळतात यांचा एक संबंध आहे. तो असा की या प्रवाहांमुळे जे प्रामुख्याने आडवे आहेत, उभे नाहीत ज्याला आपण हॉरीझॉन्टल म्हणतो असे आहेत त्यामुळे जमिनीवर ज्या प्रमाणे पाणी माथ्याकडून पायथ्याकडे येते किंवा वाहते तसेच काहीसे यामध्ये देखील होते असा समज शास्त्रज्ञांचा आहे. ते म्हणतात की: 

“पाणलोटामधील भूजल हे त्या पाणलोटाच्या टोपोग्राफीची (चढ उतार) नक्कल करते असे आढळून आले आहे. म्हणून पाणलोट भूजल मापनाचे एकक मानले गेले आहे” (ढोकरीकर १९९१). ढोकरीकर हे भूजल विभागाचे १९८८ ते १९९१ संचालक होते.   

भूजलाच्या आधारे पाणलोटांचे प्रकार  

एकदा भूजलाचा आणि पाणलोटाचा संबंध प्रस्थापित केल्यावर मग विभागाने पाणलोटाची भूजलाच्या दृष्टीने तीन प्रकार मांडले. एक म्हणजे रन ऑफ पाणलोट, दुसरे रिचार्ज पाणलोट,तिसरे म्हणजे साठवण पाणलोट. पहिले दोन प्रकार हे शक्यतो नदी खोऱ्यातील वरच्या बाजूला म्हणजेच नदीच्या उगम किंवा तारुण्यावस्थेत असलेल्या ठिकाणी आढळतात तर तिसरा पाणलोट हा प्रामुख्याने नदी खोऱ्यातील म्यॅच्युर किंवा वयस्क अवस्थेत असलेल्या नदीच्या भागात आढळतात. सातत्याने ही मांडणी भूजल विभागाने केली आहे. नावांवरून कळेल तसे रन ऑफ पाणलोटात आपल्याला भूजल साठा जास्त आढळत नाही कारण पाणी अधिकतर वाहून जाते. यामुळेच इथे आपल्याला खडक वरच्यावर एक्स्पोज दिसतात, मातीचा थर जस्त नसतो (मातीचा देखील मोठा वाटा असतो भूजल पुनर्भरण करण्यात किंवा न करण्यात). तसेच रिचार्ज पाणलोटात नावाप्रमाणेच भूजलाचे पुनर्भरण होण्यास अधिक वाव असतो. मातीचा थर, भुसभुशीत खडक अश्या रचनांमुळे हे शक्य होते. तिसऱ्या म्हणजेच साठवण पाणलोटामध्ये भूजलाचे साठे मुबलक असतात, पाणी जास्त काळ टिकते.  

इथेच न थांबता त्याआधारे विभागाने तिथल्या पाणी उपलब्धतेवर आणि शेती व्यवस्थेवर या पाणलोट प्रकारांचा होणार परिणाम देखील मंडल आहे. रन ऑफ पाणलोटामध्ये हंगामी शेती- पावसाळ्यापुरती अशी होते (भीमाशंकर ला गेलाय कधी?). रिचार्ज मध्ये थोडाबहुत साठा असल्याने रबीची थोडी पीकव्यवस्था प्रस्थापित होते. तसेच साठवण पाणलोटात (स्टोरेज) आपल्याला बागायती किंवा बारमाही शेती करणे शक्य होते कारण पाण्याची उपलब्धता वर्षभर असते. याबरोबरच वेगवेगळ्या योजनांसाठी असलेले प्राधान्य देखील या पाणलोटनिहाय बदलतात. उदा. रोजगार हमीतून मिळणाऱ्या विहिरी. या कुठे असाव्यात इत्यादी आपल्याला कळते.  

मग्गीरवार आणि उमरीकर (२०११)

इथेच थांबू नका. या प्रत्येक पाणलोटाच्या देखील तीन प्रकारांची मांडणी विभागाने केली आहे. म्हणजेच प्रत्येक पाणलोटामध्ये देखील तीन झोन आढळतात. एक असतो रन ऑफ झोन, दुसरा रिचार्ज तर तिसरा स्टोरेज किंवा साठवण झोन. म्हणजेच एका पाणलोटामध्ये आपलयाला ही तीन झोन आढळतात. वर मांडल्याप्रमाणे भूजलाची उपलब्धी आणि इतर संरचना तश्याच असतात. हे अतिशय महत्वाचे आहे कारण भूजलाचे मापन करण्यासाठी निश्चित केलेल्या निरीक्षण विहिरी असूदेत किंवा एखादी योजना किंवा कार्यक्रम असूदेत, याला खूप महत्व आहे. पुढे ते आपण बघणार आहोत.  

पाणलोटाच्या आधारे भूजलाची ज्ञाननिर्मिती  

वर बघितल्याप्रमाणे आपण भूजल या भूगर्भीय गोष्टीची आणि पाणलोट या भूस्तरीय रचनेची सांगड घातली. यामुळे काय झाले तर आपण भूजल जाणून घेण्यासाठी पाणलोटाची संकल्पना वापरली आणि त्याआधारे आपल्या भूजलाच्या माहितीची निर्मिती करायला सुरुवात केली. कशी ते आता पाहू. हे विशेषतः १९७० नंतर घडले आणि त्यामध्ये भूजल विभागाचे मोठा वाटा आहे.  

१. पाणलोटनिहाय भूजल पातळी सर्वेक्षण विहिरींचे जाळे 

आपण वर बघितल्याप्रमाणे पाणलोटाची तीन प्रकार असतात तसेच एका पाणलोटामध्ये तीन झोन असतात. या तीन झोन मध्ये प्रत्येकी एक याप्रकारे तीन विहिरींची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे १५०० पाणलोटांमध्ये जवळपास ३९०० विहिरींचे जाळे आहेत. अनेक कार्यक्रम आले आणि गेले पण या प्राथमिक निरीक्षण विहरींचे जाळे तसेच आहे. या सर्व विहिरी म्हणजे उथळ जलधर किंवा जास्त खोल नसतात. अनेक ठिकाणी या विहिरी म्हणजे तिथले आड असतात, किंवा ज्यावर पम्प नाही बसवलाय अश्या विहिरी असतात. अश्या पद्धतीचे नियमच या विहिरींच्या निवडीकरिता घालून देण्यात आले आहेत.  

मग्गीरवार आणि उमरीकर यांच्या नुसार या विहिरी तिथल्या पाणलोटाला रिप्रेझेंट करणाऱ्या असाव्यात (२०११). त्यांच्यानुसार “भूजल पातळीचे मापन हे एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके मोजण्याइतकेच महत्वाचे आहे. आरोग्य विज्ञानात डॉक्टर जितके महत्व हृदयाच्या ठोक्यांना देतो/देते, तितकेच महत्व या भूजल पातळीला एखादा भूजल अभ्यासक किंवा शास्त्रज्ञ देत असतो.” 

या भूजल पातळीची नोंद ज्या निरीक्षण विहिरींच्या आधारे घेतली जाते ती जलधर निहाय नसून ती पाणलोट निहाय आहे हे इथे मांडणे महत्वाचे वाटते. उदा. उस्मानाबाद जिल्ह्यात आज ४१ पाणलोट विभागाने अधोरेखित केले आहेत. त्यामध्ये एकूण ११४ निरीक्षण विहिरींचे जाळे आपल्याला दिसते. अर्थात ही मांडणी जेव्हा केली जाते तेव्हा ती तालुका किंवा जिल्हापातळीवर केली जाते आणि म्हणून पाणलोटनिहाय झालेले काम लोकांच्या पुढे येत नाही (लातूर मधील वर मांडलेला अनुभव यामुळेच घडला असावा).  

याचाच उपयोग आजपण करून भूजल विभाग भूजलाचे मूल्यांकन किंवा असेसमेंट करते.  

२. पाणलोटाच्या आधारे भूजलाचे मूल्यांकन  

देशभरामध्ये भूजलाचे मूल्यांकन वेळोवेळी केले जाते. मूल्यांकन म्हणजे काय तर एखाद्या परिसरामध्ये भूजलाचे पुनर्भरण किती झाले आणि तिथे एकूण उपसा (माणसांनी केलेला तसेच नैसर्गिक विसर्ग जसे झरे इ.) किती झाला याचे गणित मांडून घेतलेला आढावा. याआधारे एखाद्या परिसरात काही योजना राबवायच्या का नाही राबवायच्या हे ठरवले जाते. एकीकडे फक्त वैज्ञानिक घटना म्हणून याकडे बघत असतांना त्याच्या सामाजिक-आर्थिक आणि राजकीय परिणामांचा विचार केला तर ह्या विज्ञानाला तपासणे महत्वाचे वाटते.  

मूल्यांकनाच्या पद्धत वेळोवेळी बदलण्यात आली आहे. आजच्या घडीला देशभरातील भूजल विभाग भूजल मूल्यांकन समिती २०१५ किंवा ज्याला जीईसी २०१५ असे संबोधले जाते ती पद्धत वापरतात- त्यांनी सुचवलेली. त्याआधी १९९७ मध्ये जीईसी पंथात ठरवण्यात आली होती. त्याआधी १९८४ मध्ये सर्वात पहिले जीईसी म्हणून ही पद्धत उदयाला आली. १९७० च्या दशकात भुजा अतिउपस समिती पद्दत म्हणून थेट अतिउपसा ही गृहीतक ठरवून ही करण्यात आले होते.  

भूजल मूल्यांकन अहवाल २०१४ मधून  

महाराष्ट्रात एकूण भूजलाची परिस्थिती काय याचा ढोबळ अंदाज विभागाने १९७३ मध्ये घेतला मग अतिउपसा समितीच्या पद्धतीनुसार १९७९ मध्ये भूजल मूल्यांकन करण्यात आले. वेळोवेळी ते बदलत गेले आणि आज विभागाने २०१७ चा हा सर्वात ताजा अहवाल नुकताच २०२२ मध्ये प्रकाशित केला आहे. २०१७ चा अहवाल येण्यास इतका वेळ? (मध्यंतरी सरकार बदलले होते- अहवाल अत्यंत पॉझिटिव्ह होता- त्याची थेट सांगड उप मुख्यमंत्रांनी नुकतीच जलयुक्त शिवार बरोबर केली आहे- डोक्यात काही वाजतेय?? याबद्दल कधीतरी लिहीन, वेगळे). आता नक्की ह्याचा परिणाम जलयुक्त मुळे झाला का तो बदललेल्या भूजल मूल्यांकन पद्धतीमुळे- सांगणे आत्ता कठीण आहे.  

तर पाणलोटनिहाय भूजल मूल्यांकन करण्याचे कारण म्हणजे पाणलोटाची आणि भूजल रचनांचा मेळ. तसेच गाळाच्या प्रदेशात (गंगेचे खोरे, आपल्याकडे तापीचे खोरे) तालुका किंवा मंडल किंवा ब्लॉक ह्या राजकीय-प्रशासकीय एकेकाचा आधार घेण्यात येतो कारण गाळाचा प्रदेश अंत्यंत व्यापक किंवा पसरलेला असतो (शेकडो किलोमीटर) पण कठीण खडकांमध्ये असे नसल्याने मूल्यांकन समितीच्या शिफारसीनुसार अश्या ठिकाणी पाणलोट हे एकक मानले जाते. यामुळे महाराष्ट्रात पाणलोट हे एकक नियमित रूपाने वापरण्यात येत आहे.  अर्थात प्रशासकीय कारणांसाठी पाणलोटनिहाय झालेले हे मूल्यांकन पुढे जाऊन जिल्हावार किंवा तालुकावार मांडले जाते (apportion केले जाते). यामुळे मोठी गल्लत होते (पुन्हा- वरील लातूर अनुभव)- कशी ते आपण पुढील भागात पाहणार आहोत.  

३. भूस्तरीय रचनांच्या आधारे भूजलाचा मागोवा 

भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक कर्तव्य-कामं असतात. यामध्ये दोन प्रमुख कामांकडे पाहूया. एक म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी भूजलाचा स्रोत देणे. तसेच जल संवर्धन किंवा पाणलोट विकास कार्यक्रम तसेच वेगवेगळ्या योजना (पोकरा किंवा जलयुक्त शिवार इ) यामध्ये भूजल पुनर्भरणासाठी योग्य स्थान निर्दीष्ट करणे.  

यददल विभागने जाहिर केलेल्या गाइडलाइन्स बघितल्या किंवा त्याचे नॉर्म्स बघितले तर जाणवते की त्यामध्ये भूस्तरीय निरीक्षणातून भूगर्भीय आकलन आणि निर्णय प्रक्रिया केली जाते. यामध्ये पाणलोट या भूस्तरीय रचनेच्या वेगवेगळ्या घटकांचा उपयोग केला जातो. माती, मुरूम, नाले, चढ-उतार यांच्या निरीक्षणांच्या आधारे आपल्याला भूजलाचे निर्णय घेतले जातात असे दिसते.  

उदा. आपण एखादा भूजलाचा स्रोत (विहीर इ) कसे द्यायचे याबाबद्दलचे काही ठोकताळे किंवा नॉर्म्स बघुयात (भूजल विभाग अहवाल १९९०). भूजल अधिकारी जेव्हा एखाद्या गाव शिवारात फिरत असतील तेव्हा कशाच्या आधारावर योग्य स्थान किंवा जागा निवडावी याचे काही निकष: 

१. दोन ओढ्यांच्या मधील भाग किंवा ३० सेंटीमीटर मातीचा थर किंवा ५ मीटर खोलीपर्यंत मुरुमाचा खडक अथवा माती असलेले क्षेत्र  

२. दाट झाडी, जुडपे, वनस्पती असलेला भाग  

३. नदी किंवा ओढ्याचे बदललेले पात्र असा भाग तिथे दगड, गोटे आढळून येतात.  

४. नदी किंवा ओढे यांच्या वळणावरील भाग  

५. ओलसर किंवा दमट भूभाग  

अयोग्य स्थान टाळण्यासाठी देखील काही सूचना आपल्याला आढळतात: 

१. ३० सेंटीमीटर पेक्षा कमी माती असलेला भाग  

२. ५ मीटरपेक्षा कमी मुरुमांचा भाग  

३. डोंगर किंवा टेकाडावरील ५० मीटर खाली उताराचा भाग   

ढोकारीकर त्यांच्या पुस्तकात म्हणतात तसे नगण्य पण महत्वाच्या अश्या भूजलाचे भूपृष्ठीय निरीक्षण हे भूजलाची माहिती निर्माण करण्यास अत्यंत महत्वाचे ठरते (१९९१). नाल्यांमध्ये पाण्याचा पाझर, ओलसर जागा ही काही उदाहरणं. जमिनीखालील भूजल आणि जमिनीवरील घटक कसे एकमेकांशी जोडले गेले आहेत हे यावरून लक्षात येते.  

थोडक्यात.. 

वरील मांडणीतुन हे स्पष्ट होते की महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर भूजल ज्ञान निर्मितीमध्ये, भूजलाच्या आकलनामध्ये पाणलोट या भूस्तरीय संरचनेचा मोठा उपयोग केला गेला आहे. यामध्ये आपण सुरुवातीला बघितले की पाणलोट आणि भूजलाचा परस्पर संबंध मांडला. भूजल साठा करणारे जलधर आणि पाणलोट यांच्यातील संबंध आपण बघितला. त्याच्या आधारे महराष्ट्रात १९७० च्या नंतर आपल्याला पाणलोट आधारित भूजल माहितीची निर्मिती झाल्याचे दिसले. त्यामध्ये पाणलोटाच्या आधारे निरीक्षण विहिरींचे जाळे असेल, पाणलोट पातळीवर भूजल मूल्यांकन आणि पाणलोटातील घटक (माती, मुरूम, नाले, झाडे) यांच्या आधारे भूजलाच्या स्त्रोतांची निवड इ. आपल्याला बघायला मिळाले.  

आता पुढील भागात आपण यामधील गुंतागुंत बघणार आहोत. निरीक्षण विहिरी आणि पाणलोट, त्यांचा भूजल आणि जलधर यांच्याशी संबंध आणि त्यातील काही विरोधाभास किंवा प्रश्न आपण तपासणार आहोत. तसेच पाणलोट आधारित मूल्यांकनातून निर्माण होणारे प्रश्न काय आहेत याचा मागोवा घेणार आहोत. थोडक्यात जमिनीखालील भूजलाची ज्ञान निर्मिती जमिनीच्या वरच्या प्रक्रियांमधून आणि वैज्ञानिकांच्या दैनंदिन कामातून कशी उदयास येते ह्याचा आढावा घेणार आहोत. हा ह्या लेखाचा गाभा, त्याचे analysis असणारा दुसरा भाग असेल.  

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s