४ फेब्रुवारी २०२०. स्थळ डेक्कन बस स्टॅण्डसमोरील बाक. वेळ संध्याकाळी पाच वाजताची.
कर्वेनगर मधील माझ्या घरावरून नदीपात्रातून सायकल हाकत हाकत मी बस स्टॅन्ड जवळ येऊन पोहोचलो. कुमारभाऊ ठरल्याप्रमाणे भेटायच्या ठिकाणी आले होते. दोघेजण बाकावर बसलो आणि मग मागे झालेल्या कामांची उजळणी आणि पुढे काय करता येईल याबद्दल चर्चा केली. मी ज्या संस्थेत काम करत होतो त्याच्या माध्यमातून कुमारभाऊ आणि त्यांच्या शहादा-नंदुरबार येथील कामाची ओळख झाली. आदिवासी पट्ट्यातील काम आणि पाण्याची भीषण परिस्थिती, त्यामधील inequity आणि त्यातून निर्माण होणारी व्यवस्था याबद्दल कुमारभाऊ मुद्देसूद आणि विज्ञाननिष्ठ काम करायच्या हेतूने संपर्कात आले होते. अर्थात त्याआधी देखील मराठवाड्यातील काही गावांमध्ये कुमारभाऊंच्या माध्यमातून भूजल व्यवस्थापनाचे काम केले गेले होते. पण शहाद्याचा हा परिसर वेगळा होता. शहाद्याहून धडगावला जाणाऱ्या रस्त्यावर हे गाव (मुळात छोट्या छोट्या वस्त्यांचे एक गाव). गावामध्ये एकदेखील विहीर नाही, पण बोअर मात्र झालेली. यातून इतकेच कळते की १९७०-८० पासून सुरु झालेल्या भूजल क्रांतीपासून हा परिसर, ही गावं दूर राहिली होती. अर्थात गावापासून १५-२० किलोमीटर शहाद्याकडे आल्यावर आपल्याला ऊस, नगदी पिकं यांचा परिसर दिसतो, म्हणजे इथे भूजलाचे कार्यक्रम पोहोचले नाही असे म्हणता येणार नाही, पण कांहीजण त्यापासून वंचित राहिले (ठेवले गेले?).

कुमारभाऊंचे काम या समाजाबरोबर. वन हक्क कायदा आणि त्याची अंमलबजावणी, वन खात्याच्या विविध कार्यक्रमांमुळे येथील आदिवासी समाजावरील अन्याय, त्यांची दैनंदिन परिस्थिती, शेतीतील सुधारणा, पाण्याचे संवर्धन आणि त्याचा वापर यावर कुमारभाऊंचा वस्तुनिष्ठ अभ्यास, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि एक प्रामाणिक सामाजिक कळकळ जाणवली. कुमारभाऊ जाण्याची बातमी मिळाली तेव्हा मी या दिवसाचे माझ्या मोबाईल मधील नोट्स काढून वाचले. शेवटची भेट. तेव्हाच त्यांनी मला सांगितले होते की त्यांना कर्करोगाचा त्रास सुरु झाला आहे, ट्रीटमेंट सुरु आहे. स्वतःच्या आजाराविषयी अधिक चर्चा न करणाऱ्या कुमारभाऊंच्या आजाराबद्दल आणि त्यांचा ‘fighter स्पिरिट’ बद्दल मी बोलणे योग्य ठरणार नाही.
२७ नोव्हेंबर २०१५. स्थळ– यशदा, पुणे.
आपण एखाद्या क्षेत्रात काम केले की अनेकदा आपल्याला एक प्रकारची ‘expertise’ येते, किंवा आपण किमान तसा विचार करतो. बरेचदा असे होते की आपल्याला अश्या expertise च्या सीमा ओळखता येत नाही. विषयानुरूप जरी ती expertise बरोबर असली तरी स्थानिक पातळीवर काम करताना विषयांची गुंतागुंत होते. आपल्याला सर्वच माहित आहे आणि आपण आपल्यापुढील प्रश्न सोडवू शकतो असा उगीचच एक आत्मविश्वास निर्माण होतो. उदाहरणार्थ आपल्याला कदाचित जंगलांविषयी चांगले कळत असेल, त्यातील वनस्पतींचे प्रकार, प्राण्यांचे प्रकार इत्यादी. पण एखाद्या जंगलामध्ये आणि त्याच्याशी निगडित अनेक मुद्दे पुढे येतात. मातीचा प्रकार, त्याची धूप, पाण्याचे स्रोत, पाण्याचे पर्कोलेशन, जंगलाचे आणि त्याचं आजूबाजूच्या शेती-इतर उद्योगाचे संबंध इ. आपल्याला जर ह्या अश्या expertise च्या सीमा ओळखता आल्या, त्या appreciate करता आल्या तरच मला वाटते की आपण इतर विषयांकडे समतोल राखून आणि ‘unlearning’ च्या भावनेतून काही नवीन गोष्टी समजून घेऊ शकतो.
ही गोष्ट मला कुमारभाऊंकडून शिकायला मिळाली. सत्तरीतील एखादा पुरुष (पुरुष हे देखील इथे महत्वाचे आहे), नाहीतर उगाच वही पेन घेऊन, शांतपणे बसून एखाद्या कार्यक्रमात टिपण घेत बसणार नाही. कुमारभाऊंना हे नक्कीच जाणवले होते की पाणी हा विषय आणि त्यातही भूजल हा समजून दृष्टीने एक जटील विषय आहे. त्यामुळे इतके वर्ष फिल्ड मध्ये राहून देखील त्यांनी नव्याने हा विषय समजून घेण्याचा आणि त्याबद्दल कार्य करण्याचा निर्धार केला आणि तसेच अनेक कार्यकर्ते घडवण्यासाठी प्रयत्नशील होते. बीड मधील ताकरवन, निथरूड, मोहा यागावामधील तरुण कार्यकर्ते असतील, तर शहाद्यातील दरा-चिंचोऱ्यातील कार्यकर्ते असतील असे अनेकांना त्यांनी या विषयात घडवण्याचा प्रयत्न केला.

एखादा विषय पुढे न्यायचा असेल, त्याचे फक्त ‘islands ऑफ success’’ न बनवता त्याची एक चळवळ करायची असेल तर असे कार्यकर्ते घडणे ही त्या त्या विषयासाठी खूप आवश्यक आहे. सध्या वातावरण बदल किंवा क्लायमेट चेंज बद्दल आपण हे बघतोय, अनेक कार्यक्रम- शासकीय, अशासकीय पातळीवर पुढील पिढीला घडवण्यासाठी निर्माण केले गेले आहेत. अश्या कार्यक्रमांनी आणि त्यातील experts यांनी कुमारभाऊंच्या या क्वालिटी बद्दल नक्की विचार करावा.
१३ जून २०१८. स्थळ- दरा चिंचोरा
सकाळपासून गावफेरी पूर्ण केल्यानंतर दऱ्यामधील एका कार्यकर्त्याच्या घरी कुमारभाऊंनी जेवायचे नियोजन केले होते. भात आणि आमटी, सोबत चवीला लोणच्याची फोड. मला आणि माझ्या सहकार्याला दरदरून घाम फुटला, तिखटामूळे. कुमारभाऊंनी शांतपणे आपले जेवण संपवले आणि आमच्यासाठी बाहेरच्या बाकावर जाऊन थांबले. आम्ही जेवलो आणि बाजूच्या टपरीवरून काही चॉकलेट घेतल्या. उन्हाळा संपत आला होता- पावसाचे काही चिन्ह नव्हते- दुपारचा उकाडा होता. थोड्यावेळ बसुया असे आम्ही सुचवले आणि कुमारभाऊंनी ते मान्य केले. तिथे मला त्यांचा जीवनपट कळला. ते जास्त काही सांगत नव्हतेच पण मीच कुतूहल म्हणून प्रश्न विचारात होतो.
आज जाणवतंय- तेव्हा एक प्रश्न विचारायला हवा होता. मी ज्या पिढीत घडलोय त्यामध्ये सामाजिक कामाचा विचार स्पष्ट आहे- कामाची मूळ प्रेरणा जरी असली तरी तिला मापायचे मापदंड ठरलेले असतात- पगार, पगारावरील असमाधान, वरिष्ठांबरोबर जमणे/न जमणे, पिअर प्रेशर वगैरे. त्यामुळे एका कामातून दुसऱ्या कामामध्ये जाणे, काम बदलणे, एरिया ऑफ वर्क बदलणे अश्या माध्यमातून जुळवून घेता येते. पण आपणच सुरु केलेली एक चळवळ, त्याला फुटलेलं वेगवेगळे फाटे, यामध्ये कधीतरी उदासीनता येत असावी, कधीतरी कमजोर वाटत असेल, अश्या वेळी ते काम, ती चळवळ, तो कार्यकर्त्यांचा गोतावळा सोडणे- किंवा त्याचाशी जुळवून घेणे कितपत शक्य आहे? अश्यावेळी त्यांच्यातील कार्यकर्ता आणि व्यक्ती म्हणून त्यांची घालमेल यातील समतोल त्यांनी कसा राखला असावा. हा प्रश्न नक्कीच आता महत्वाचा वाटतोय. आणि त्यावरील त्यांचे अनुभव जाणून घ्यायला जास्त आवडले असते.
दरा ज्या डोंगरांच्या पायथ्याशी वसलेले आहे तिथे माथ्यावर एक माध्यम सिंचन प्रकल्प झाला आहे. धरण बनले असले तरी अजून त्याला कालवे काढलेले नाहीत. तसेच कालव्याचे जे डिझाईन आहे ते दरा चिंचोरा गावाला वळसा घालून पुढील गावांना (politically organised, सधन, मोठे शेतकरी, बिगर आदिवासी समाज) जोडून देण्याचे नियोजन आहे. दुसरीकडे वन हक्क कायद्यांअंतर्गत दरा चिंचोऱ्यातील आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचे आपल्या हक्काचे असे पट्टे कसायला मिळाले आहे. हे घडवून आणण्यासाठी स्थानिकांचे आणि कुमारभाऊंचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले आहे.

आजच्या आमच्या पिढीला एखाद्या साचेबंद पद्धतीने विषयांकडे आणि त्या अनुशंघाने त्यावरील उपाययोजनांकडे बघण्याची सवय झाली आहे. सामाजिक कामामध्ये कार्यकर्त्यांपासून प्रोफेशनल हा प्रवास पूर्ण झाला असल्यामुळे आज असे कार्यकर्ते दुर्मिळ झाले आहेत. चळवळींची जागा आता प्रोजेक्ट्सनी घेतली आहे. पण ही गुंतागुंत आहे, आणि एखाद्या विषयकडून सुरु केलेले सामाजिक काम कसे पसरत जाते हे मला कुमारभाऊंच्या प्रवासातून दिसले. दऱ्यातील सातपुडा डोंगररांगांमधील नव-नवीन मिळालेले शेतीचे पट्टे आणि ते कसणाऱ्या आदिवासी भगिनी आणि बांधव यांच्यापुढील शाश्वत शेतीच्या दृष्टीने मातीची धूप थांबवणे, संवर्धन करणे आणि पाण्याचे नियोजन करणे अनिवार्य होते. हे ओळखून कुमारभाऊ पाण्याकडे, पाणलोटाकडे वळले होते आहे त्यातूनच माझा त्यांच्याशी संबंध आला होता.
स्थानिक काम सूक्ष्म स्वरूपाचे असते- immediate असते, म्हणजेच शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला तेथील फरक जाणवू लागतात. एखाद्या नाल्यावर बंधारा बांधला तर पुढील पावसाळ्यानंतर आपल्याला तिथे फरक दिसून येईल. पण अश्या कामांचे आणि अश्या कामांवर होणारे प्रादेशिक (अगदी आपण आता ग्लोबल वगैरे टाळले) परिणाम कदाचित आपल्या नजरेत, (प्रोजेक्ट्च्या स्कोपमध्ये- ते थिअरी ऑफ चेंज वगैरे जे काही आज म्हणतात- म्हणावे लागते) पटकन सामावणारे नसतात. कुमारभाऊंच्या कामांमधून एक कान आणि डोळा स्थानिक तर दुसरा कान आणि डोळा प्रादेशिक असणे का महत्वाचे आहे हे लक्षात येते. दरा- चिंचोऱ्यातील काम एकीकडे पण महाराष्ट्रात, त्याच्या पाण्यात काय चालू आहे याकडे त्यांचे लक्ष होते, अभ्यास होता आणि अश्या कामांचा एक कुतुहलपूर्वक आदर्श असायचा. गेल्या दशकातील दुष्काळाची परिस्थिती, मराठवाडा आणि पाणी, शेती- पाणी आणि जमीन याचे प्रश्न कसे एकमेकात मिसळलेले आहेत हे त्यांच्या बोलण्यातून जाणवायचे. आमच्यासारख्या ‘प्रोफेशनलसाठी’ तो एक अभ्यासाचा आणि अप्रूप वाटावा असा विषयच होता.

‘बारगिरा, सोल्जर शब्दाची उत्पत्ती माहिताय का? ऑक्सफोर्ड डिक्शनरी काढून बघ. ज्याचा जनतेच्या सॉलिडॅरिटीशी, मुक्तीशी संबंध, तो सोल्जर.’(डोंगर म्हातारा झाला पुस्तकातून)
माझ्यासारख्या सोजिरांच्या गर्दीमधील एक सोल्जर गेला. दुःख नक्कीच आहे- पण प्रेरणा आहे- सामाजिक कामाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाची आणि ते घडवून आणण्याच्या प्रक्रियेची.